इतिहास बदलवणारा महामानव
रविवार ,२ डिसेंबरला नानकचंद रत्तू सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले,
तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले,
" आलास वेळेवर ! आज आपल्याला खूप काम करायचे आहे." ते बिछान्यातून उठले,
चहा घेतला व 'कार्ल मार्क्सचे ' 'दास कॅपिटल ' या ग्रंथातील मजकूर परत
डोळ्यांखालून घालून ' buddha & his dhamma ' या ग्रंथाच्या लेखनासाठी
बसले. आणि नानकचंद ला टाईप करायला देत होते. हे काम संध्याकाळपर्यंत चालले
.दिनांक ४ डिसेंबर ला बाबासाहेब सुमारे ८-४५ ला उठले . सकाळी सुमारे ११
वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी याबाबतीत
विचारविनिमय करावा अशी विनंती केली.बाबासाहेब त्यांना म्हणाले, ' यासंबंधी
आपण उद्या रात्री ८-३० च्या नंतर चर्चा करू .
दिनांक ५ डिसेंबर १९५६ ला नानकचंद ऑफिस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या
बंगल्यावर आले. तसा बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता.
बाबासाहेबांना झोप लागत नव्हती . ते अस्वस्थ होते. अशा परिस्थितीतही
बाबासाहेब मधूनमधून 'buddha & his dhamma ' या ग्रंथांचा मजकूर लिहित
होते ३-४ कागद लिहून झाले होते. तेव्हा नानकचंद संध्याकाळी ५-३० आले
त्यावेळी बाबासाहेबांचा चेहरा म्लान झालेला व अस्वस्थ असलेले त्याला दिसले
त्यांनी नानकचंदला लिहिलेले कागद टाईप करण्यास दिले. त्यानंतर काही वेळ
गेल्यावर संध्याकाळी बाबासाहेब डोळे मिटून हळू आवाजात 'बुद्धं शरणं गच्छामि
' त्रिशरण म्हणू लागले . नंतर त्यांनी नानकचंद ला 'बुद्ध भक्तिगीते 'हि
रेकॉर्ड लावायला सांगितली व त्या गीतांबरोबर आपणही गुणगुणू लागले नोकराने
जेवण आणले तेव्हा बाबासाहेब म्हणाले ' जेवणाची इच्छा नाही ' पंरतु नानकचंद
ने आग्रहाणे जेवावयास उठवले डायनिंग हॉलच्या दोन्ही बाजूंना भिंतींच्या
कडेने ग्रंथांची कपाटे ओळीने लावलेली होती. त्या ग्रंथांच्या कपाटांना पाहत
पाहत बाबासाहेबांनी एक दीर्घ निःश्वास सोडला . आणि हळूहळू चालत डायनिंग
टेबलापाशी गेले. इच्छा नसतांना दोन घास खाल्ले .नंतर नानकचंद ला डोकीला तेल
लावून मसाज करायला सांगितले . मसाज संपल्यावर ते काठीच्या साहाय्याने उभे
राहिले आणि एकदम मोठ्यांदा म्हणाले ," चल उचल कबीरा तेरा भवसागर डेरा."
त्यावेळी ते फार थकलेले दिसत होते, चेहराही एकदम निस्तेज झाला होता.
त्यांना झोप येऊ लागली तेव्हा नानकचंद ने जाण्याची परवानगी मागितली . ते
म्हणाले " जा आता . पण उद्या सकाळी लवकर ये. लिहिलेला मजकूर टाईप करावयाचा
आहे ."
नानकचंद निघाले तेव्हा रात्रीचे ११-१५ झाले होते.
दिनांक ६ डिसेंबर ला नानाकचंद सकाळी नेहमीपेक्षा उशीराच उठेल. ते सायकल
बाहेर काढतात तोपर्यंत तर दारावर सुदाम उभा राहिला म्हणाला 'माईसाहेबांनी
तुम्हांला लागलीच बोलावले आहे. नानाकचंद तसेच निघाले त्यांनी सुदामला
विचारले एवढ्या घाईने का बोलावले आहे ? आणि बंगल्यावर पोहचल्यावर ते
बाबासाहेबांच्या बिछान्याजवळ गेले आणि म्हणाले " बाबासाहेब मी आलोय ! असे
भांबवून मोठयांदा ओरडले . साहेबांच्या अंगाला हात लावला त्यांना ते गरम
असल्याचा भास झाला म्हणून ते छातीचा मसाज करू लागले ऑक्सिजन देण्याचा
प्रयत्न केला हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले ,तेव्हा कळून चुकले कि ,
बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रचंड ग्रंथ आटोपलेला आहे .
बाबा गेल्याचे पाहून नानकचंद मोठ्यांदा रडू लागले. बंगल्यातील सर्व जण गोळा
झाले माळ्याने तर बाबासाहेबांच्या पायावर लोळण घेतली आणि तोही रडू लागला .
पुढची व्यवस्था करायची म्हणून नानकचंद यांनी ९ वाजता फोन करण्यास सुरवात
केली व सर्वांना हि बातमी कळविली आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह मुंबईस
राजगृह येथे विमानाने आणण्यात येणार आहे हि बातमी मुंबईतील लोकांना कळली
तेव्हा लोकांचे थवेच्याथवे विमानतळाकडे जाऊ लागले. दिल्लीहून बाबासाहेबांचा
पार्थिव देह घेऊन विमान निघाले सांताक्रूझ विमानतळावर रात्री उतरले .तिथे
आधीच सगळी व्यवस्था करण्यात आली होती .अॅम्ब्यूलन्स विमानतळावरून
राजगृहाकडे जाण्यास निघाली. हजारो लोक थंडीत कुडकुडत रस्त्याच्या दोन्ही
बाजूंना हातात हार घेऊन व डोळ्यातून अश्रूंना वाट करून देत उभे होते. वंदना
घेत घेत अॅम्ब्यूलन्स हळूहळू चालत राजगृहाला आली. तेव्हा राजगृहापुढे
जमलेल्या लाखो लोकांच्या तोंडून एकच आर्त स्वर निघाला .'बाबा ! ' आणि ते
रडू लागले .
स्त्रियांचा आक्रोश तर विचारायलाच नको ! मातांनी आपली मुले बाबांच्या
चरणावर घातली. काहींनी भिंतीवर डोकी आपटली, कित्येकजणी मुर्च्छित पडल्या.
हिंदू कॉलनीतील सवर्ण हिंदूंना बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे दर्शन
घेण्यासाठी रांगेत तीन-चार तास उभे राहावे लागले . हिंदू कॉलनीतील लोकांनी ,
' आमच्या वस्तीतील ज्ञानियांचा राजा गेला ! आमच्या हिंदू कॉलनीचे भूषण
हरवले ! ' असे उद्गार काढले.
एवढी जरी गर्दी तेथे जमली होती तरी लोक अत्यंत शिस्तीने अत्यंदर्शनासाठी
उभे होते.
बाबांचा पार्थिव देह राह्गृहात आणल्यानंतर बौद्ध भिक्षूंनी धार्मिक विधी
पार पाडला हा विधी अत्यंत साधा होता. नंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहावर
पावित्र्यनिदर्शक अशी शुभ्र वस्त्रे चढविण्यात आली पार्थिव देहाजवळ असंख्य
मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. त्यांच्या उशाला बुद्धांची एक मूर्ती
होती. दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे दोन लक्ष ( लाख ) लोकांनी अंत्यदर्शन
घेतले . बाबासाहेबांच्या दुःखद निधनामुळे सुमारे दोन लक्ष कामगारांनी हरताळ
पाळला. त्यामुळे पंचवीस कापड गिरण्या पूर्णपणे बंद होत्या. अनेकांनी आपली
दुकाने बंद केली होती. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी देखील हरताळात भाग
घेतला होता.
एका शृंगाररलेल्या ट्रकवर बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला .त्या
मागे बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यांच्याशेजारीच पुत्र यशवंतराव
(उर्फ भय्यासाहेब आंबेडकर ) व पुतणे मुकुंदराव बसले होते. मिरवणुकीची
लांबी सुमारे दीड ते दोन मैल होती. किमान दहा लाख लोकांनी भारताच्या या
बंडखोर सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुतर्फा गर्दी केली
होती. एवढी मोठी प्रचंड गर्दी ! पण बेशिस्त वर्तनाचा एकही प्रकार कुठेही
घडला नाही. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली परळ
नाक्यापासून मिरवणूक एल्फिन्स्टनरोडकडे निघाली तेव्हा जिकडे तिकडे
माणसांशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते.बरोबर दिनांक ७ डिसेंबर ५ वाजता
महायात्रा दादरच्या चौपाटीवर आली. डॉ. बाबासाहेबांच्या शवाला अग्नी
देण्यासाठी भागेश्वर स्मशानभूमीतच समुद्राच्या बाजूच्या भिंतीलगत एक वाळूचा
प्रचंड चौथरा तयार करण्यात आला होता . बाबांचे शव ट्रकच्या खाली
उतरविण्यात आले मेणबत्यांचे तबके घेतलेले चार भिक्षु पुढ होते.
बाबासाहेबांचे शव सर्वांना दिसेल अशाप्रकारे एका उंच व्यासपीठावर ठेवण्यात
आले. मुंबई सरकारतर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण
करण्यात आला. मुंबईतील व बाहेरगावची अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होती.
भिक्षूंनी धार्मिक विधीस प्रारंभ केला ते करूण दृश्य पाहतांना अनेकांच्या
डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांचा हा विधी आनंद कौसल्यायन यांच्या
मार्गदर्शनाखाली झाला .यानंतर बाबासाहेबांचे शव चंदनाच्या चितेवर चढविले
आणि डॉ. बाबासाहेबांच्या पार्थिव शवाला सशत्र पोलीस दलाने त्रिसर बंदुकीने
बार काढून मानवंदना दिली व बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला पुत्र
यशवंतराव यांच्या हस्ते संध्याकाळी ७-१५ वाजता अग्नी देण्यात आला
बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देताच यांचे आप्तस्वकीय यांना संयम आवरता आला
नाही ते चीतेकडे धावले ओक्साबोक्शी रडू लागले . व त्यांनी पुन्हा ' बाबांचे
' शेवटचे दर्शन घेतले. आणि काही क्षणात बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा
अनंतात विलीन झाला.
रविवार दिनांक ९ ला सकाळी ८ वाजता दादर चौपाटीवर विस्तीर्ण वाळूच्या
पटांगणात जाहीर शोकसभा झाली अध्यक्ष भदंत कौसल्यायन हे होते. आणि अनेक
वक्ते उपस्थितीत होते. अनेकांची भाषणे झाली श्रीमती रेणू चक्रवर्ती यांनी
भाषणात हे उद्गार काढले ' आम्हा तरुण सभासदांना डॉ. आंबेडकर यांच्या
सान्निध्यात राहण्याचा अगर त्यांच्यबरोबर काम करण्याचा सुयोग मिळाला नाही.
डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना व हिंदू कायद्याची संहिता जी मुळ तयार केली
होती , ती उकृष्ट होती. आणि जोपर्यंत या दोन कृती भारतात अस्तीत्वात राहतील
तोपर्यंत आंबेडकरांच्या अद्वितीय बुद्धीमत्तेचा व कर्तुत्वाचा स्मृतीदीप
भारतात तेवत राहील .हिंदू समाजातील पिडीत व दलित लोकांना त्यांनी ज्ञानाची
संजीवनी पाजून जिवंत केले आणि आपल्या मानवी हक्कांसाठी लढण्यास उभे केले.
त्याचप्रमाणे त्यांनी पददलितांबद्दलची वरिष्ठ वर्गाची दृष्टी बदलून टाकली
हे त्यांचे अनुपम थोर राष्ट्रकार्य होय.
त्यानंतर आचार्य अत्रे यांनी सुद्धा भाषण केले ते म्हणाले या महान
नेत्याच्या मृत्युच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मरणानेच आज
आपले हसू करून घेतले आहे .मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत ? मग
त्याने इतिहास निर्माण करण्याऱ्या एका महान जीवनाच्या या ग्रंथावर ,
इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली ? भारताला महापुरुषांची वाण कधी
पडली नाही . परंतु असा युगपुरुष शतकाशतकात तरी होणार नाही. झंझावाताला मागे
सारणारा ,महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर
त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड असा बंडखोर शूरवीर , बहाद्दर पुरुष
आज मृत्युच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे.त्यांचे वर्णन
करण्यास शब्द नाहीत.
चैत्यभूमी वदे सागरा ,
हे सागरा माझी विनवणी ऐक रे जरा
शांत करुनी तुझ्या त्या लाटा
दोन पावले मागे सरकून घे आता,
येईल निळ्या भीमसैनिकांचा अलोट गर्दीचा ताफा
चरण स्पर्श करण्या त्यांच्या बापाच्या बापा
जो घेत असे वर्षानुवर्षे येथे चिरकाल विसावा
करता लढाई मनुवाद्यांशी तो ना मागे सरला
बहुजन कोटी कुळांचा उद्धार करुनी तो होता दमला
भीम चरणावर टेकविताच भीमसैनिक माथा
उसळतील अश्रूंच्या निळ्या लाटाच लाटा
टाहो फोडुनी बाबा बाबा म्हणुनी मारतील रे हाका
करतील भीमगर्जना अन दणाणतील आसमंत सारा
भाग्यशाली मी उदरी माझ्या घेत आहे तो विसावा
या जगाच्या पाठीवर ना शोधून दिसे असा सितारा
तू ही या जगी मोठा भाग्यवान आहेस सागरा
तुला लाभला आहे माझ्या चैत्यभूमीचा पवित्र किनारा
ह्या एकमात्र सितारा मुळे पाहे आम्हा हा जग सारा
आम्हा आजही आठवितो ६ डिसेंबर १९५६ दिन तो काळा
सोडून गेला होता बहुजन कोटी कुळांचा एकमेव सहारा
महापरिनिर्वाण दिनी उसळला होता येथेच भीमसागर सारा
त्या अथांग सागराचा कोणत्याच दिशेला नव्हता किनारा
ऐकुनी महापरिनिर्वाण हृदयद्रावक संवाद चैत्यभूमी अन त्या सागरा
भीमसैनिक वाहतो अश्रूंची करुनी फुले त्या महान शिल्पकारा.......
भारतीय घटनेचे शिल्पकार , भारताचे पहिले कायदे मंत्री , भारतरत्न
,स्त्रियांचे उद्धारकर्ते, बोधिसत्व ,प .पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
विनम्र अभिवादन व
कोटी कोटी प्रणाम
टिप्पण्या