युद्ध नको मज बुद्ध हवा
युद्ध नको मज बुद्ध हवा हे आज सारे जग सांगत आहे आज जगाला भगवान बुद्धाच्या शिकवणुकीची गरज आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागांच्या नागपुरात बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली आणि सारे बहुजन बुद्धाच्या सम्यक सम्बुद्ध अस्या बुद्ध धम्माच्या छताखाली आले
आज सारे जगच बुद्धाच्या शिकवनिची गरज भासत आहे बुद्ध धम्माखेरीज अनेक धर्म या जाहतात आहेत पण हे धर्म या जगतात कमीत कमी ५ ० ० वर्षे राहू शकतात पण बुद्ध धम्म या जगतात जोपर्यन्त जीव सृष्ठी अस्तित्वात आहे तोपर्यंत बुद्ध धम्म ह्या जगतात असेल कारण बुद्धाच्या शिकवणीचे सिद्धांत पहिले तर बुद्धाने प्रथम देव नाकारला नंतर आत्मा नाकारला कारण ह्या जगात मन हे केंद्रबिंदू असून जगतात दु:ख आहे व त्यावर माणसाला विजय मिळवता येतो त्यासाठी माणसाला सम्यक अश्या गोष्ठी माणसाला आत्मसात कराव्या लागतात बुद्धाने जगाला शांतीचा महामार्ग सांगितला आहे आज जो शांतीच्या मार्गाने जातो त्याला बुद्धाच्या शिकवणीचे ज्ञान होते महामानव बाबासाहेबांनी हाच मार्ग बहुजनाला सांगितला आज सारे जगच बुद्धाच्या वाटेवर आहे कारण जगाला तारण्यासाठी या तथागत बुद्धाची शिकवण अनुसरायला पाहिजे
तथागतांनी मानवाला मानवतेचा महान संदेश दिला जगाला शांतीचा मंत्र दिला बुद्धाच्या विचारांची प्रेरणा आज आपल्याला घ्यायला पाहिजे जगणे बुद्धाला स्वीकारले आता आपल्याला स्वीकारणे गरजेचे आहे
बुद्ध आणि बुद्धत्व ही संकल्पना विश्वामधील जे जे उदात्त, उन्नत, महन्मंगल आहे आणि बुद्धिनिष्ठ आहे त्या सर्व चराचराशी व्यापून उरलेली आहे. ह्या पृथ्वीवरचा बुद्धाचा जन्म हा पूर्ण सुखावहच नाही तर पूर्ण चराचराला प्रकाशमय करणारा आहे. बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम जन्मलेच नसते एवढी कल्पनाही आपण केली तर बुद्धिनिष्ठ विचारी माणसाचा थरकाप उठतो. पूर्ण मानवतेला शांती, अहिंसा, प्रज्ञा, करुणा, शील, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव याचे अलौकीक पैलू पाडून सर्व भौतिक, अभौतिक विश्वाला विकारांच्या नव्हे तर विचारांच्या परिमंडळात देव, ईश्वर, आत्मा, परमात्मा या सर्व कल्पना मिथ्या ठरवून फिरायला लावणारा हा पहिला बुद्धिनिष्ठ, विचारी मानव! इतर सर्व धर्मसंस्थापकांनी बुद्धाचे महन्मंगल विचार उचलले आणि त्यांनी आपल्या ईश्वर, अल्लाप्रणित विचाराना जोडून पूर्ण माणसाच्या विवेकाला, बुद्धिला स्वर्ग-नरकाच्या दावणीला बांधले. सर्व कर्मकांडापासून मुक्त राहून पूर्ण विश्वाकडे निरामय नजरेने पहाणारा आणि भौतीक वस्तू आणि जीव यांच्याशी आपण माणूस म्हणून कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या पातळीवर कसे नाते व वर्तन ठेवले पाहिजे याचे स्पष्ट दिशादर्शन करणारा, आपले पूर्ण तत्वचिंतन प्रज्ञा, शील, करुणा, शांती, सदाचार, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय या शाश्वत मूल्यांवर उभा करणारा बुद्ध हा जगातील एकमेव तत्त्वचिंतक, विद्वान होता.
चमत्कार आणि अनाकलनीय घटना याला बौद्धदर्शनशास्त्रात काडीचीही किंमत नाही. उलट अशा घटना ह्या असत्यच आणि भ्रामक मानल्या पाहिजेत. आपली प्रज्ञा जागृत ठेवली तर त्याचा निरंतर विकास होऊ शकतो आणि प्रज्ञेच्या विकासातूनच विश्वातील सर्व दुर्बोध, अनाकलनीय, चमत्कारसदृश्य सर्व वस्तू, घटनांना आपल्याला अर्थ व क्रम लावता येतो असे बुद्धाचे प्रतिपादन होते. तरीही बुद्धाच्या पूर्ण आयुष्यात निसर्गाने त्याला पूर्ण अभय दिल्याचे मला दिसते. महानिर्वाणाअगोदरचा अतिसाराचा फार भयंकर झालेला त्रास सोडला तर महाकारुणिक बुद्धाला फारसा शारीरिक व्याधींचा सामना करावा लागलेला दिसत नाही. अर्थात आरोग्यावर अगाध ज्ञान मिळवलेला वैद्य भिक्षू जीवक आणि बुद्धाच्या फार समीप राहून बुद्धाची सेवा करणारा बुद्धाचा चुलतभाऊ आणि जवळचा शिष्य आनंद यांनी बुद्धाचे वैयक्तिक आरोग्य आणि दिनचर्या सांभाळलेली आहे. राजगृहातील पर्वतावर बुद्ध नेहमी ध्यानधारणा करीत असता हा जीवक त्या पर्वताच्या पायथ्याशी बसून लोकांचे आणि बुद्धाचेही आरोग्य सांभाळीत होता. कोणा मातेने उकिरड्यावर टाकलेले हे अनाथ अर्भक राजाश्रयाने वाढले. तक्षशीला (आता पाकिस्तानात) विद्यापीठामध्ये त्याने वैद्यकीय शिक्षण घेतले आणि पुढे पूर्ण जीवन त्याने लोकसेवा आणि वैद्यकीय संशोधन यात व्यतीत केलेले आहे. मानवी मेंदूवर व आतड्यावर त्यांनी शस्त्रक्रिया केल्याचे संदर्भ संस्कृत आणि पाली वाङ्मयात मिळतात. त्याच्या दवाखान्याचे अवशेष आजही त्या पर्वताच्या पायथ्याशी पुरातत्व खात्याने संरक्षित करून ठेवले आहेत.
बुद्धाच्या आरोग्याची काळजी जीवकने काही काळ घेतली तर त्या काळी, देवी, पटकी आणि इतर महामारी रोगांची साथ हजारो माणसाना एकादमात घेऊन जात असे. बुद्धाना या महामारीची साथ शिवली नाही हे ह्या पूर्ण जगाचे भाग्य म्हटले पाहिजे. बुद्धावर त्या महामारीत मृत्यूने अकाली घाला घातला असता तर पूर्ण जग एका मानवी अलौकीक तत्वचिंतनाला, मानवतेच्या संशोधन संकल्पाला आणि प्रकल्पालाही मुकले असते.
जग आज जे मानवीय लेण्याचं स्वरूप लेवून उभे आहे ते ९०% संस्कार एकट्या बुद्धाचे आहेत. सर्व धर्मसंस्थापकांवर बुद्धाच्या विचारांचा संस्कार आणि प्रभाव आहे. अनेकांनी बुद्धाच्या तत्वचिंतनातला मध्यवर्ती सार घेऊन तो आपल्या धर्माच्या पोतडीत टाकून स्वर्ग-नरक, आत्मा, परमात्मा आणि ईश्वरात्मा याच्याशी त्याचा संबंध जोडलेला आहे. बुद्ध आणि इतर धर्मसंस्थापकांमध्ये एक फार मोठा फरक म्हणजे बुद्धाने सकल मानवी जात ही रुढी, परंपरा, आत्मा, परमात्मा, ईश्वर, स्वर्ग-नरक ह्या सर्व भ्रामक, खुळचट, अतार्किक कल्पनातून मुक्त करून त्याला वैज्ञानिक नैतिकता, तर्क, प्रज्ञा, करुणा, शील, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय ह्या मानवी शाश्वत मूल्यांवर उभी केली. यालाच सुसंस्कृत आणि विन्मुक्त समाज म्हणता येईल. विन्मुक्त मानव याची अनुभूती कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर कधीही घेता येईल. त्यासाठी फक्त स्वत:च्या प्रज्ञेचीच गरज आहे. म्हणून बुद्ध जन्माला आलेच नसते किंवा त्यावेळच्या साथीना बळी पडून अकाली त्यांचा मृत्यू झाला असता तर ह्या जगाचे आणि मानवी समुदायाचे काय झाले असते याचा एकेकदा विचार करून मी अक्षरश: हादरून जातो. देवी, पटकी ह्या साथीवर १९ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत तसा कोणताही उपाय नव्हता.
बुद्ध जसे फिरले तसेच का फिरले त्या आजच्या उत्तर प्रदेश आणि बिहार येथील जवळजवळ हजार कि. मी. परिसराचा परीघ मी दोनदा फिरून आलो. सम्राट अशोकाने बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळावर जी वेगवेगळ्या स्वरूपात स्मारके उभी करून ठेवली आहेत त्याचे अवलोकन करून बुद्धाच्या या थोर दूरदृष्टीच्या शिष्याला बुद्धापाठोपाठ कोटी कोटी सलाम करावे लागतात! या सर्व स्थळांची छायाचित्रे आणि व्हिडीओ क्लीपींग माझ्याकडे आहेत. या सर्व स्मारकांचे अतिशय काळजीपूर्वक उत्खनन आणि जतन करण्याचे सारे श्रेय ब्रिटीश राज्यकर्त्यांना विशेष करून लॉर्ड कनिंघह्याम यांना जाते. स्वत: ह्या देशाचा व्हॉइसरॉय असूनही त्यांनी स्वत: ह्या कामावर देखरेख ठेवलेली तर आहेच; पण स्वत:च्या निरीक्षणाखाली काही स्थळांचे उत्खनन केले आहे. सर्व स्मारके अडीच हजार वर्षांच्या कालखंडात काळाच्या उदरात गडप झालेली होती. १८ व्या शतकापर्यंत बुद्ध हा रामासारखा पुराणपुरुष म्हणूनच भारत देशाच्या ज्ञानवंताना ज्ञात होता. तो ऐतिहासिक महापुरुष आहे हे शोधून काढण्याचे आणि त्यानंतर ते पुराव्यांच्या आधारे सिद्ध करण्याचे सर्व श्रेय हे ह्या ब्रिटीश सत्ताधीश आणि मिशनर्यांना द्यावे लागते. हे मिशनरी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आले होते; पण भारताच्या वास्तव्यात जगाला एक फार मोठी देणगी देऊन ते गेले.
बुद्धाच्या पश्चात त्याच्या अनुयायांनी ज्ञान, विज्ञान, विविध शास्त्रे आणि विज्ञानवादी नैतिकता म्हणजे धम्म यांच्या सैद्धांतिक पातळीवर फार मोठा पाया घालण्यासाठी त्यावेळच्या काही अनुकूल मतांच्या राजाश्रयाने शैक्षणिक अनुषंगाने जगामधली पहिली निवासी विद्यापीठे उभारण्याचा खूप दूरदृष्टीचा निर्णय घेतला आणि त्या प्रक्रियेतील पहिले विद्यापीठ उभे झाले ते आजच्या तक्षशीलेत (आता पाकीस्तान). त्यानंतर साकेत, नालंदा ही विद्यापीठे भारतात उभी राहिली. नालंदा विद्यापीठाचे तर भग्नावशेष आजही बिहारमध्ये नालंदा गावात उभे आहेत.
या विद्यापीठातून जीवशास्त्र, नीतीशास्त्र, तर्कशास्त्र, भूगोल, इतिहास, व्याकरण, रसायनशास्त्र, विज्ञान आदी शाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी देश-विदेशातील विद्वान विद्यार्थी प्रवेश घेत. अशाच ह्यूएनत्संग आणि फायह्यान ह्या अनुक्रमे दुसर्या शतकात आणि सहाव्या शतकात ह्या विद्यापीठात चिनी विद्वान विद्यार्थ्यांनी बुद्ध चित्र-चरित्र, दर्शनशास्त्र आणि त्यावेळचा बौद्धमय भारत आपल्या ग्रंथामध्ये भरून ठेवलेला आहे. बुद्ध चित्र, चरित्र आणि प्राचिन भारत समजून घेताना त्यांनी लिहिलेल्या आणि इथून घेऊन गेलेल्या अनमोल ग्रंथांचा फायदा जगातल्या अनेक विद्वान मंडळींना झालेला आहे. नालंदा विद्यापीठ सहा मजल्यांचे होते आणि त्यात १० हजार निवासी विद्यार्थी ज्ञानार्जन करीत होते तर १ हजार अध्यापक आचार्य ज्ञानदानाचे कार्य करीत होते.
ह्यूएनत्संग आणि फायह्यान यांनी लिहिलेल्या आपल्या भारतातील प्रवासवर्णनाचा अनुवाद इंग्रजीमध्ये झाल्यानंतर जगाला एका मानवीय अस्मिता, तत्वज्ञान याचा फार मोठा खजिना गवसला. ह्या प्रवासवर्णनात (भारतात त्यावेळी काय काय स्थिती होती, बौद्ध तत्वज्ञान काय होते, कोणत्या विद्यापीठात किती निवासी विद्यार्थी, किती अध्यापक होते; कोणत्या विहारात किती भिक्षू होते, त्यांची दीनचर्या काय होती? त्यांचे कार्य काय होते? त्यांचे बौद्ध दर्शनशास्त्राला योगदान काय होते? सम्राट अशोकाने कोणत्या जागेवर कोणती स्मारके उभी केली आहेत? त्यांची वैचारिक क्रांती याचा ‘याची देही याची डोळा’ पाहिलेला समग्र इतिहास ह्या दोन्ही चिनी विद्यार्थ्यांनी आपल्या आत्मकथनात लिहून ठेवला असल्याने ब्रिटीश राज्यकर्त्यांना ती ती स्थळे भारतात शोधणे शक्य झाले. अशाच बिहारमधील वैशाली येथे (प्रख्यात बौद्ध भिक्षुणी आणि बुद्धाच्या संपर्काआधीची गणिका) एका स्थळावर अथक प्रयत्नाने ब्रिटीश सरकारच्या पुरातत्व खात्याने बुद्धाच्या अस्थी (राख) शोधून काढलेल्या आहेत आणि आजही त्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पाटणाच्या वस्तूसंग्रहालयात ठेवलेल्या आहेत. मी, पत्नी अनिला आणि मुलगा मंदार यांच्यासह महत्प्रयासाने याचे दर्शन घेतले. इतकेच नव्हे तर या माझ्या जगद्वंदनीय महागुरुच्या सान्निध्यात भारताच्या तीन हजार वर्षांच्या प्रज्ञेच्या इतिहासाला उजाळा देत आयुष्यातील पाच मिनिटे घालवलेली आहेत. मी प्राचिन भारताच्या शोधाला निघालो म्हणूनच मला हे शक्य झाले. मी बुद्धाच्या सान्निध्यात राहिलो हे आजही मला खरे वाटत नाही.
इकडे बौद्ध तत्त्वज्ञान आणि त्याचा इतिहास मातीमोल करण्याचे कारस्थान ब्राह्मणी धर्माने यथासांग तडीस नेले. दहाव्या शतकात भारतातील बौद्ध धम्म, दर्शनशास्त्र पूर्णपणे ह्या भूमीवरून नामशेष झाला; पण चीन, थायलंड, तिबेट, जपान, कोरीया, व्हिएतनाम, कंबोडिया, ब्रह्मदेश, जावा, सुमात्रा, श्रीलंका ज्या देशात तो गेला, त्या देशातील लोक, समुदायाचे त्याने भले केले. मूळ स्थितीत तो त्यानी जपला. मूळ भारताची पाली भाषा त्यानी उच्चारासह जपली; पण त्याचे आपल्या लिपीमध्ये संस्करण केले. त्यामुळे पाली भाषेतील सर्व बौद्ध वाङ्मय त्या त्या देशात मूळ अवस्थेत स्थिरस्थावर झाले. बौद्ध तत्वज्ञान सागराएवढे अफाट आहे. ते सर्व ह्या सर्व बौद्ध देशांमध्ये आज उपलब्ध आहे. पण ते पुन्हा मूळ स्वरूपात भारतात येण्यास कारण ठरला तो एक महान प्रतिभेचा मूळ गोमंतकीय. त्याचे नाव आचार्य धर्मानंद कोसंबी. तिसरी-चवथी शिकलेल्या आणि सर्वार्थाने वाया गेेलेल्या या सांखवाळच्या २२ वर्षांच्या तरुणाने अठराव्या शतकाच्या शेवटी केवळ बुद्ध तत्त्वज्ञानाच्या लालसेपोटी घर सोडले आणि कधी अनवाणी, कधी उपाशी, कधी उघड्यावर रात्री काढत श्रीलंका गाठले. मराठी भाषेचे जुजुबी असलेल्या ज्ञानाच्या बळावर श्रीलंकेत पहिल्यांदा इंग्रजी, त्यानंतर सिंहली, त्यानंतर पाली भाषेत पारंगत होऊन सिंहली लिपीतील श्रीलंकेत असलेले सर्व पाली भाषेतील मूळ ग्रंथांचे त्यांनी अध्ययन केले आणि ब्राह्मण्यवादाने बुद्धाच्या घरत्यागाची रचलेली कपोलकल्पीत कहाणीही त्यांनी मोडीत काढून बुद्धाच्या गृहत्यागाचा नवा इतिहास पुराव्यासह मांडला. अनेक पाली ग्रंथाचे त्यानी संशोधन करून त्यातील तत्वज्ञानाची पुनर्मांडणी केली. त्याचा सगळ्यात मोठा फायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करून घेतला. ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हा इंग्रजी ग्रंथ लिहिताना डॉ. बाबासाहेबानी धर्मानंद कोसंबीच्या पुनर्मांडणी केलेल्या अनेक ग्रंथाचा आणि लावलेल्या शोधांचा संदर्भ घेतलेला आहे. मूळ स्वरूपातील बुद्ध चित्र-चरित्र, तत्वज्ञान आणि त्याची व्यापक बैठक समजून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेबांचा मूळ इंग्रजीमध्ये लिहिलेल्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ ह्या नावाने मराठीमध्ये सर्वत्र उपलब्ध असलेले त्याचे भाषांतर प्रत्येक नागरिकाने वाचावयास हवे!
‘बुद्ध, धम्म, संघ’ या पायावर बुद्ध तत्वज्ञान आणि दर्शनशास्त्र, बौद्ध समाजाची उभारणी बुद्धाने केली आहे. बौद्ध तत्वज्ञानाचे काहीच ज्ञान नसलेले काही महाभाग बुद्धाला स्वत:ला इथे ठेवायचा प्रयत्न करतात. तसे त्याला ठेवायला काहीच हरकत नाही; पण बुद्ध ही संज्ञा आहे. ते सर्वसाधारण नाम नाही. विशेष नाम असू शकते आणि ते बौद्ध तत्वज्ञानाप्रमाणे जात, धर्म, कर्मकांड, दैववाद, भय, आसक्ती याच्या पलिकडे जाऊन विन्मुक्त बुद्धिवादी मानवी अवस्था म्हणजे अर्हत अवस्थेत पोचलेल्या मानवाला प्राप्त होतो. असा बुद्धिवादी मानवी समुह निर्माण करण्याचा बुद्धाचा प्रयत्न होते. ह्या अवस्थेला बुद्ध हे नाव देता येईल. अशा अवस्थेतील सर्व बुद्धिवादी मंडळीना बुद्ध संबोधता येईल आणि असे अनेक बुद्ध होऊन गेलेले आहेत असेही एक कथन आहे. पण सिद्धार्थ गौतमाचाच नंतर झालेला बुद्ध हा एकमेव बुद्ध होय. त्या अर्थाने बुद्ध, धम्म आणि संघ’ यामधील बुद्ध संज्ञा आलेली आहे. त्या बुद्धिवादी मंडळींचे सर्व आचरण हे विज्ञानवादी नैतिकता, साधनसुचिता, प्रज्ञा, शांती, करुणा, शील, न्याय, बंधुभाव आणि स्वातंत्र्य (मानवी स्वातंत्र्य) यावरच आधारलेले असल्याने या पूर्ण आचरणाला बौद्ध दर्शनशास्त्रात धम्म म्हटलेले आहे. म्हणजे हे सारे व्यक्तीगत आणि सार्वजनिक जीवन हे ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असे असल्याने यातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आणि सहवास हा दुसर्याला ‘सुखकारक व हितकारकच’ असतो. त्या अर्थाने सर्व बुद्ध मानवी जीवांचा स्वभाव, हा आदी कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंतीही कल्याणकारी असल्याने तो प्रत्येक बुद्धाच्या किंवा ज्ञानी माणसाच्या व्यक्तीगत पातळीवर न राहता सार्वत्रिक होत असल्याने तो समाजाचा धम्म (धर्म) बनतो. असा धम्म (धर्म) पाळणारा समाज म्हणजे संघ होय. बुद्धाचा संघ म्हणजे समाज, राज्य, देश वा जग होय. ह्या तिन्ही संकल्पनेचा अर्थ, अन्वयार्थ हा असा आहे. ह्या तिन्हीनाही अभिवादन करून पुढे जाणे हे मनुष्यमात्राचे, जर तो विनम्र आणि ज्ञानी, बुद्धिवादी असेल तर पहिले कर्तव्य ठरते! म्हणून बौद्ध आचरणाप्रमाणे कोणीही व्यक्ती ‘मी बुद्धाला शरण जातो; मी त्याच्या धम्माला शरण जातो, मी त्याच्या संघाला शरण जातो’ असे तिनदा प्रतिपादतात. इतकेच नव्हे तर सर्वोत्कृष्ट संघ म्हणजे समाज निर्मितीसाठी बुद्धाने पूर्ण समाज अध:पतीत करणार्या पाच दुगूर्णांच्या नि:पात करण्यासाठी ‘मी चोरी करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी हिंसा करणार नाही, मी लैंगीक दुराचार करणार नाही व मी मादक पदार्थांचे (दारू, अफू, चरस, तंबाखू आदी) सेवन करणार नाही’ अशा पाच शीलांचे दैनंदिन जीवनात पालन करण्यासाठी प्रतिपादनच केले नाही तर त्याचे ह्या संघाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. ही पंचशीले पाळणार्या सर्वसाधारण बौद्ध माणसाला ह्या प्रक्रियेत उपासक म्हणतात, पुढचे ‘आर्य अष्टांगिक मार्ग (म्हणजे मानवी आचरणाच्या थोड्या कठीण आठ अवस्था)’ हे सामान्य ‘उपासका’साठी नाहीत (उपासकाने त्या दैनंदिन जीवनात पाळल्या तर अतिउत्तम) तर त्या परिव्रज्रकासाठी आहेत. म्हणजे बुद्ध विचारांच्या बुद्ध अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे परिव्रज्रक भिक्षू, बोधीसत्व, सोतापन्न, अर्हत आणि शेवटी बुद्ध (मनुष्यत्वाची सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ अवस्था) अशा त्या अवस्था आहेत. यासाठी सर्वसंग परित्याग म्हणजे, आई-वडील, बायको, घरदार, नातेवाईक, धन-दौलत सोडून चीवर (पीत वस्त्र धारण करणे) धारण करून अत्यंत कडक आणि काटेकोर नियमावली आपल्यावर लादून आपल्या मनालाच आपल्यावर नियंत्रण ठेवायला लावणे. चंचल मनावर दरक्षणी नियंत्रण ठेवण्यासाठी ‘आनापानसती’ आणि ‘विपश्यना’सारखी तर सर्व जगात प्राणीमात्रात आणि भौतिक जगाकडे मैत्रीपूर्णरीतीने वागण्यासाठी ‘मैत्री भावनेचे’ ध्यानाचे मार्ग बुद्धाने सांगितले आहेत. दिवसभरात हे ध्यानाचे सराव तुम्ही कुठेही, कधीही बसून करू शकतात आणि त्याची अनुभूती घेऊ शकतात.
आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे परिव्राज्रक (श्रमण) पासून सुरू होऊन बुद्धत्वापर्यंतच्या ह्या सर्व अवस्था म्हणजे मनुष्यत्त्वाच्या (वैयक्तीकरित्या) श्रेष्ठत्वपणाच्या अवस्था आहेत. त्यासाठी पद मिळत नसते, प्रतिष्ठा नसते, पैसा नसतो; अभिमान नसतो. मान नसतो. एखादे आसनही मिळत नसते. सभा-समारंभ नसतो. कोणी बोलावलेच तर माणसांच्या कर्तव्यावर बोलता येते. किंवा कनिष्ठ भिक्षूना मार्गदर्शन करता येते. तेही त्यांची इच्छा असल्यास. अन्यथा एक वेळच्या दानावर (भिक्षेवर) कितीही मोठ्या, श्रीमंत घरातला किंवा गरीब घरातला असला तरी दोघानीही समान तत्त्वावर, समान पद्धतीने आपले वैयक्तीक जीवन मरणापर्यंत सारायचे असते. विशेष कलागुण असले तर त्याचे संक्रमण लोकापर्यंत कोणताही गाजावाजा न करता किंवा प्रसिद्धी किंवा इतर कशाचीही अपेक्षा न धरता करायचे असते. विद्यापीठातील पदवीदानासारखीच ही अवस्था असते. त्या त्या पदाचा अंगीकार करण्यासाठी धडपडणार्या भिक्षूच्या आचरणावर त्या अवस्थेतील श्रेष्ठ भिक्षूंचे लक्ष असते आणि त्या अधिकारी भिक्षूने त्याचे आचरण लक्षात घेऊन शिफारस केली तर त्याला ते पद (म्हणजेच अवस्था) प्राप्त होऊ शकते. बौद्ध विचारात चुकीला दंड देणारा कोणी नसतो. आपले मनच आपल्याला शासन करू शकते. बुद्ध विचारांचा ‘प्रज्ञा, शील, करुणा’ ह्या केवळ तीनच तत्वांचा निग्रह आपण आपल्या जीवनात केला तरी आपण आपले जीवन मरेपर्यंत कोेणतेही विशेष परिश्रम न करता सार्थकी लावू शकतो. त्याचा अन्वयार्थ असा आहे -
प्रज्ञा : ही हिर्याप्रमाणे असते. विश्वातील सर्वांत कठीण आणि तेजस्वी असा हा पदार्थ. तो आपल्या अंगीभूत गुणानी श्रेष्ठ आहेच; पण इतर कोणत्याही कठीण पदार्थाला भेदण्यासाठी हिर्याचाच उपयोग करतात. माणसाची प्रज्ञा ही अशीच. प्रज्ञा असलेला माणूस हा अतिशय सारासार विचार करणारा आणि ज्ञानी असतो. प्रज्ञावान माणूस नवनिर्मिती प्रक्रियेत सतत कार्यरत राहतो. सृजनशील अवस्था हीच. प्रज्ञा नसलेला माणूस अंधश्रद्धा, देव-देवस्की, कर्मकांड यात खितपत पडलेला असतो. त्याची अवस्था जनावरासारखीच. त्याला मेंदू असूनही विचार करता येत नाही. म्हणून ज्ञानवान समाज घडवायचा तर प्रत्येक माणसाकडे प्रज्ञा असणे आवश्यक आहे. त्यामुळे सतत नवीन आणि मनुष्याचे श्रम हलके करणारी साधने समाजाला मिळू शकतात.
शील : शील ही सुगंधासारखी गोष्ट आहे. शीलाचा सुगंध जगभर जात असतो. मनुष्यमात्राच्या अंगीभूत गुणांनी शील हे व्यापून उरलेले आहे. शील असलेल्या माणसाची अवस्था ही सुगंधाने भरलेल्या पुष्पासारखी असते. चुरडले, मुरडले, पायदळी तुडवले तरी त्याच्या बाह्य रूपावर परिणाम होऊ शकतो; पण परिमळ तसाच राहतो. प्रज्ञा असलेला माणूस बुद्धिनिष्ठ विचार अवश्य करू शकतो; पण त्याच्याकडे शील (चारित्र्य) नसेल तर तो चोर, लबाड, दुष्ट, दुराचारी, बलात्कारी, भ्रष्टाचारी आणि लुटारू, दरोडेखोरही होऊ शकतो. म्हणून प्रज्ञेच्या बरोबरीने प्रत्येक माणसाकडे चांगल्या समाजनिर्मितीसाठी शीलही असणे आवश्यक आहे.
करुणा : ही लोण्यासारखी असते. द्रवणे आणि जीवनसत्व पुरवणे हे तिचं काम. दीन, दरिद्री बघीतला की त्याला द्रवता आले पाहिजे. हृदयाला पाझर फुटणे म्हणजेच एखाद्याची दया येणे. त्याला मदत करण्यासाठी प्रेेरीत होणे. यालाच दातृत्त्व असेही म्हणतात. आपल्याकडे असलेल्या धनाचा, ज्ञानाचा, शक्तीचा, ऊर्जेचा वापर इतर वंचितांच्या कामी झाला पाहिजे असा त्याचा विचार असतो. यालाच दात्वृत्वशील माणूस म्हणतात.
केवळ प्रज्ञा हा एक गुण, केवळ प्रज्ञा आणि शील हे दोन्ही गुण असून चालत नाही तर त्या दोन्ही गुणांच्या जोडीला करुणा हाही गुण असावा लागतो. तरच तो माणूस परिपूर्ण माणूस बनू शकतो. अशा गुणयुक्त माणसांनी समाज सद्गुणी, गर्भश्रीमंत, सुखी, आनंदी, मैत्रीपूर्ण आणि शांतता पाळणारा बनू शकतो. अशा समाजात गरीबी नसते. हालअपेष्टा नसतात आणि दु:खाचा लवलेशही नसतो. आपल्या देशातला सर्व गर्भश्रीमंत माणूस हा समाजविरोधी तत्त्वांनी भरलेला आहे. उलट अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत माणूस बिल गेट्स आणि वॉरेन बफेट हे बुद्धांनी प्रतिपादलेल्या ‘प्रज्ञा, शील, आणि करुणा’ ह्या तिन्ही गुणांनी युक्त आहे. केवळ प्रज्ञा असल्यामुळे त्यांनी नवनिर्मिती करून प्रचंड संपत्ती कमावली. शीलामुळेच त्यांचा तोल न ढळल्यामुळे त्यांनी आपल्या श्रीमंतीबरोबरच चारित्र्यालाही कलंक लावला नाही आणि या दोन्ही गुणाबरोबर त्यांच्याकडे करुणा असल्यामुळे जगाच्या दु:खाची त्यांना जाणीव झाली. जगात गरीबीत पिजणार्या माणसांना आपण मदत केली पाहिजे याचा त्यांना साक्षात्कार झाला आणि बिल गेट्सने आपल्या एकूण संपत्तीचा ९०% हिस्सा जगाच्या कल्याणासाठी मिलींदा प्रतिष्ठान निर्माण करून दान करून टाकला तर बरोबर त्याच्या आठ दिवसांनी ७५ वर्षांच्या वॉरेन बफेट यांनी आपला एकूण संपत्तीमधील एकूण ८०% भाग मिलिंद प्रतिष्ठानमध्ये जगाच्या कल्याणासाठी दान करून टाकला. हे दोन्ही महापुरुष बुद्धाचे अनुयायी शोभतात. तुम्हाला असे होता येणार नाही काय?
बुद्ध हि बुद्ध आहे
टिप्पण्या